वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा जाळू नका

0
19

नागपूरदि. 4 नोव्हेंबर,: – वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन: स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

प्रकाशोत्सावासाठी अनेकांच्या घरात झालेल्या साफ़सफ़ाई सोबतच दिवाळिनिमित्त फ़ोडलेल्या फ़टाक्यांचा कचरा साचल्याचे चित्र सर्वत्र आहे. यात न जळालेल्या फ़टाक्यांचा देखिल समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी हा कचरा वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत टाकण्यात आला आहे.  वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना यापुर्वी देखील घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या दिवसाचे तापमान अधिक असल्याने कच-यास आग लागण्याची शक्यता आहे..

वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेजळ्चे तापमान अश्या आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फ़टका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कच-याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक असल्याने  जिल्हयातील नागरिकांनी उघडयावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. फ़ेकलेल्या कचरा पेटविल्याने वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.