गोंदिया,दि.०७ः जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या देवरी व गोंदिया उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या निवेदमध्ये मनमर्जी अटी शर्ती लावून आपल्या हितेशी कंत्राटदारांना लाभ पोचविण्याचा प्रयत्न अधिकार्यांनी केल्याची तक्रार काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कृषी विभागाकडून काढलेल्या निविदा सुचना क्र.बी-१/१४/उ.वि.क.अ. देवरी/सन २०२४-२५ मध्ये सदर विभागाने मृद व जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाचे अनुपालन न करता आपल्या काही विशेष कंत्राटदारानाच काम मिळावे याकरीता निविदा सुचनेत आपल्या मनमर्जीप्रमाणे अटी व शर्ती घालून कामे देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर निविदेआधिसुध्दा 5 ते 7 कोटी रुपयाची कामे अश्याच मनमर्जीप्रमाणे विशेष दोन-तीन कंत्राटदाराना दिली.त्या निविदेमध्ये सुध्दा तक्रारकर्ते कंत्राटदारांनी निविदा सादर केली होती,मात्र त्यांना अपात्र करण्यात येऊन विशिष्ट तिन कंत्राटदाराना C.S.R (0.01%) कमी दरामध्ये कामे दिलेली आहेत.परत आता त्याच पध्दतीचा वापर करुन नवीन निविदा सुचनेतील कामे त्याच दोन-तीन कंत्राटदाराना देण्याचा प्रयत्न असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ज्या तीन विशेष कंत्राटदाराची निवड केली त्यामध्ये देवा गोंविदराम,मातोश्री कंस्ट्रक्शन अर्जुनी मोरगांव व सतबिरसिंग भाटिया यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.या सर्व प्रकरणाच्या सखोल चौकशीकरीता जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा जलसंधारण अधिकारी, गोंदिया,जिल्हा कृषी अधिक्षक, गोंदिया,कृषी उपविभागीय अधिकारी, गोदिया/देवरी व आयुक्तालय नागपूर यांनाही अन्यायग्रस्त कंत्राटदार राजकुमार पी. पारधी,अभिषेक शर्मा,महेश अग्रवाल,रोहित मेंढे व अजय सेंगर यांनी पत्र दिले आहे.त्या पत्रावर संबधित अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.