वाशिम, दि. १८ मार्च – जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी मौजे हिवरा रोहिला येथे भेट देऊन जलसंधारण विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी जलतारा योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांचे उद्घाटन केले आणि या उपक्रमाचा शेतकरी व ग्रामस्थांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार श्री पळसकर, तालुका कृषी अधिकारी श्री जावळे,मंडळ कृषी अधिकारी श्रीमती उगले, ग्राम महसूल अधिकारी अजय मोरे, कृषी सहाय्यक देमाजी खुडे, ग्राम पंचायत अधिकारी संजय इडोळे हे उपस्थित होते.
गावात जलतारा योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्या अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी महोदया यांनी सांगितले. त्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला होणाऱ्या फायद्यांवर भर दिला आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी महोदया यांनी काल, १७ मार्च रोजी काटा कोंडाळा, झामरे आणि चिखली बुद्रुक (ता. वाशिम) या गावांना शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी जलतारा योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी करत गावातील जलसंधारण उपाययोजनांचा आढावा घेतला.
गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जलतारा शोष खड्ड्यांमुळे भविष्यात पाणीटंचाईवर मात करता येईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अधिकाधिक लोकांनी जलसंधारणासाठी पुढे यावे आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.