- कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा
गोंदिया, 18:- कृषी विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा व नवतेजस्विनी कृषी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केले आहे .
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज गोंदिया जिल्हा नवतेजस्विनी कृषी महोत्सव 2025 चेआयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, कृषी विभागाचे निलेश कानवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा नवतेजस्विनी कृषी महोत्सव 2025 चे आयोजन दिनांक 21 ते 23 मार्च 2025 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री नंदू बिसेन मैदान (मोदी मैदान) बालाघाट टी पॉईंट जवळ गोंदिया येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषी महोत्सवामध्ये 150 स्टॉल लावण्यात येणार असून यामध्ये कृषी प्रदर्शनी, पौष्टिक तृणधान्य दालन, धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, सेंद्रिय शेतीमाल विक्री, महिला बचत गटाद्वारे महिला द्वारे उत्पादित वस्तूचे दालन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, आधुनिक कृषी अवजारे, विविध विषयांवर परिसंवाद व चर्चा सत्र तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवामध्ये शेतकरी सन्मान, माविम मित्र मंडळ, सुधारक सन्मान, विशेष करून महिला शेतकऱ्यांसाठी महिला मेळावा, खरेदीदार, विक्रेता, संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.