मलेरिया निर्मुलनासाठी स्वयंसेवकांचे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

0
70

 गोंदिया– केंद्र शासनामार्फत फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट अशासकीय संस्थेच्या माध्यमातुन मलेरिया,डेंग्यु सारखे आजारांचे निर्मुलनासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.आरोग्य विभाग,हिवताप विभाग व फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यातील हिवताप अतिसंवेदनशील गावात किटकजन्य आजार तसेच मलेरिया आणि डेंग्यू बाबतची जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन त्यासाठी अतिसंवेदनशील गावात स्वयंसेवकाच्या माध्यमातुन गावपातळीवर कम्युनिटी स्वयंसेवक/समुपदेशकांची नेमणुक फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांनी केले आहे.त्या सर्वांना किटकजन्य आजाराबाबची माहीती होण्याच्या दृष्टीकोनातुन एम्बेड अशासकीय संस्थेच्या माध्यमातुन दि.17 ते 20 मार्च दरम्यान हॉटेल बाबुल ईन येथे चार दिवसीय मलेरिया निर्मुलनासाठी  प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाल्याची माहीती फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी दिली आहे.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस गिरी व एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी उपस्थितीत राहुन हिवताप व किटकजन्य आजाराबाबतचे विविध विषयावर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यशाळेत 50 कम्युनिटी स्वयंसेवक यांना प्रशिक्षित केल्याची माहीती कांचन बिसेन यांनी दिली आहे.
डॉ.विनोद चव्हाण यांनी गोंदिया जिल्ह्यात डासांसाठी बाराही महीने पोषक वातावरण असते.तसेच जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा,भात शेती,जंगलव्याप्त व झाडे झुडपी भाग यामुळे बाराही महिने डासांचे वास्तव्य असते.त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढते.तसेच पावसाळा सुरू झाल्यावर ठिकठिकाणी डबके साचतात.त्यामध्ये डासांची भरपूर उत्पत्ती होते.हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, जे.ई.आदी कीटकजन्य रोगांमध्ये वाढ होते.त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा जनजागरणाचा उद्देश आहे.या मोहिमेंतर्गत गावोगावी हँडबिल वाटप करणे, नागरिकांना हिवतापाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे, बॅनर्स, पोस्टर लावणे, जास्तीत-जास्त तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेऊन त्यांना उपचार करणे, प्रत्येक गावात हिवताप विषयक म्हणी लिहिणे, इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.कोणताही ताप हिवताप असू शकतो म्हणून ताप आल्यावर त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासून घ्यावे, हिवताप प्रतिबंधात्मक व उपचारात्मक औषधोपचार घेणे, रक्त नमुना तपासणी नंतर हिवतापास आढळल्यास ज्यांच्या रक्तात हिवतापाचे जंतू ज्या प्रमाणात असतील त्याप्रमाणे वयोमानानुसार औषधाचा डोस घेणे, हा उपचार न कंटाळता सलग घ्यावा, आपल्या गावात कीटकनाशक फवारणी पथक आल्यास आपली संपूर्ण घरे फवारून घ्यावीत, फवारणी झालेली घरे तीन महिन्यांपर्यंत सारवू व रंग देऊ नयेत, एवढी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. पारस गिरी यांनी जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याला व गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे.दरवर्षी जिल्ह्यातील मजूर हे तेंदू पत्ता, पत्ता सीजन, बास कटाई, बांधकाम, रस्ता कामे व इतर विविध कामानिमित्त स्थलांतरित करीत असतात.परंतु तिथे गेल्याने आपल्या आरोग्याची काळजी न करता दिवस रात्री कामे करुन उघड्यावरती झोपत असतात.गोंदिया लागून असलेल्या सीमा भागात जंगलव्याप्त भाग असल्याने परतीच्या वेळी येताना आजारी किंवा हिवताप संसर्ग घेऊन येण्याची शक्यता असते.सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वत्र बाहेर कमावण्यासाठी गेलेले मजुर स्वगावी आपल्या जिल्ह्यात परताना जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
किटकजन्य जनजागृतीच्या माध्यमातुन आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा, घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा,  पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका, सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात,झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा,घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे, घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये.डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात.आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू असतात परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा,पाणी उघडे ठेवू नये असे विविध आरोग्य शिक्षण लोकांना देणे आवश्यक असल्याचे डॉ.विनोद चव्हाण  यांनी सांगितले.
किटकजन्य जनजागृतीपर प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन,  तालुका समन्वयक विश्वदीप नंदेश्वर,खुमेश बिसेन, ,नुपुर कटरे, ,विक्रांत कालसर्पे,कुलदिप पुस्तोडे यांचे सह कम्युनिटी स्वयंसेवक यांनी विशेष सहकार्य केले.