सुपर-वुमन अवॉर्ड 2025 मध्ये ‘कोंडागाव मॉडेल’ ची गूंज

0
35

गोंदिया येथे सशक्त महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांसाठी डॉ. राजाराम त्रिपाठी यांची मोठी घोषणा

गोंदिया: विदर्भ, जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथे आता नवी कृषी क्रांती घडणार आहे. माँ दंतेश्वरी हर्बल फार्ममध्ये विकसित ‘कोंडागाव मॉडेल’ हे देशातील सर्वात यशस्वी कृषी नवोन्मेष असल्याचे सांगत डॉ. राजाराम त्रिपाठी यांनी जाहीर केले की, हे मॉडेल आता विदर्भात मोठ्या प्रमाणावर लागू केले जाईल.‘सुपर वुमन अवॉर्ड 2025’ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी सांगितले,”विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या नव्हे, तर आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच उद्देशाने आम्ही या भागाला आमच्या नवीनतम कृषी प्रयोगांची भूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे.”

या मॉडेलअंतर्गत ऑस्ट्रेलियन काळी मिरी, हळद, सफेद मूसली, स्टीविया आणि इतर औषधी पिकांचे मिश्रित लागवड केली जाते. विशेषतः झाडांपासून तयार केलेल्या नैसर्गिक ग्रीनहाऊस प्रणालीचा त्यांनी उल्लेख केला, जी महागड्या पॉलीहाऊससाठी किफायतशीर आणि प्रभावी पर्याय आहे. हे मॉडेल अवलंबल्यास शेतकरी आपले उत्पन्न 3 ते 4 पट वाढवू शकतात. तसेच, हे मॉडेल जैविक खताच्या निर्मितीस मदत करते आणि मोठ्या प्रमाणावर जलसंधारण देखील करते. देशातील 16 हून अधिक राज्यांतील लाखो शेतकरी यशस्वीरीत्या हे तंत्र अवलंबत आहेत.

या भव्य समारंभात समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, साहित्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सविता विनोद अग्रवाल, पिंकी पारस कटाकवार, सविता संजय पुराम, कल्याणी मोहरे (सरिता सरोज), यशोधरा सोनवणे, रजनी रामटेके, डॉ. शीतल रामादे, शालिनी बडोले, शालू कोल्हे, वर्षा बडगुजर आणि लता बाजपेयी यांचा गौरव करण्यात आला. या महिलांनी शिक्षण, आदिवासी कल्याण, आरोग्य सेवा, सामाजिक न्याय, जलसंधारण, साहित्य आणि महिला आत्मनिर्भरतेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

सोलो डान्स स्पर्धेत प्रथम एकता तिवारी, द्वितीय मनीषा माहुरे आणि तृतीय रोहिणी तोमर यांनी स्थान मिळवले. ड्युएट डान्स प्रकारात पूजा मोहितकर-मंजू पटले यांनी प्रथम, मोनिका पटले-रामेश्वरी पटले यांनी द्वितीय आणि स्वेता बनकर-रीना बनकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लोकनृत्य स्पर्धेत शबनम पठाण व त्यांच्या टीमने ग्रुप डान्समध्ये प्रथम आणि झूलेलाल ग्रुपने द्वितीय स्थान मिळवले.डान्स स्पर्धेचे परीक्षण उन्नती बुराडे आणि अस्मिता गुप्ता यांनी केले.

डॉ. राजाराम त्रिपाठी यांचा विशेष सन्मान व नागरी अभिनंदन

भारतीय कृषी नवकल्पनांमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. राजाराम त्रिपाठी यांना विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी सांगितले,”कोंडागाव मॉडेल विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन भविष्य घडवू शकते.”या कार्यक्रमाला वरिष्ठ समाजसेवक मनीष श्रीवास्तव, युवा उद्योजक प्रीतेश शुक्ला, गोंदिया पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. इंदिरा सपाटे, महिला अर्बन बँकेच्या संचालिका डॉ. माधुरी नासरे, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण गुडधे, समाजसेविका सीमा डोये, सुपर वूमन ग्रुपचे संचालक प्रमोद गुडधे, समाजसेवक विवान मिश्रा, सुपर वूमन कार्यक्रम आयोजक प्राची गुडधे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याशिका धामडे आणि नेहा पारधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संध्या डोंगरवार यांनी व्यक्त केले. आयोजन समितीत मीना टेंभरे, सुनीता ठाकूर, स्वाती साखरवाडे, आशा बेले, रेणुका कुंजाम, अंकिता बडगुजर, कल्पना गोरखे, सुषमा पिल्लारे, पिंकी मोटवानी, नीता शेंडे, नीतू पाराशर, समीक्षा पटले, शबनम पठाण, सुरेखा गायधने, हिमेश्वरी कावळे, सुषमा कारंजेकर, निधी उपरीकर, किरण उबराणी, संतोषी रहांगडाले, प्रमिला कुकडे आणि चेतना बावनथडे यांनी अथक परिश्रम घेतले.‘सुपर वूमन अवॉर्ड 2025’ हा केवळ महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा मंच ठरला नाही, तर त्याने भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ‘कोंडागाव मॉडेल’ला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. डॉ. राजाराम त्रिपाठी यांचे प्रयत्न निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेण्यात मदत करतील.