बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
30
बुलडाणा, दि. 27 : कारागृहात बंदीस्त असलेल्या बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 25 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निवडण्यात आलेल्या कलासमुहाचे कलावंतांनी मनोरंजन व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यानंतर बंद्यांना समुपदेशन व मार्गदर्शनही करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभाग व बुलढाणा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने “जिवन गाणे गातच जावे ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. समुपदेशक सतीष बाहेकर व डॉ. महेश बाहेकर यांनी बंद्यांना शारिरीक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले. त्यानंतर स्वरश्री इव्हेंटचे तनुश्री भालेराव व त्यांच्या कलावंतानी देशभक्ती, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केले. सदर गृपमध्ये अकोल्याचे गायक राजू सोनोने, कविता वरगट वादक संच यांनी आपली कला सादर करुन बंद्यांचे मनोरंजन केले. प्रसिध्द निवेदक चंद्रशेखर जोशी यांच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी बंद्यांनी देखील आपल्या फर्माईशी पेश करुन प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे समन्वयक महेश इंगळे, सुभेदार बबन खंडारे, हवालदार संजय मदारकर, दिनेश डोंगरदिवे, रविद्र आंधळे, जितेश काळवाघे, चंद्रकांत महाले, राहूल जाधव तसेच सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांनी सहाकार्य केले.