गोंदिया, दि. 27: जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, या योजनेचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभा कक्षामध्ये आज जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार, मुख्याधिकारी सालेकसा प्रमोद कांबळे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले.
गोंदिया शहरामध्ये जैन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळात गोंदिया येथे संत निवासाची व्यवस्था होण्यासाठी बहु उपयोगी हॉलची व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अल्पसंख्यांक बहूल व नागरीक्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमा अंतर्गत संविधान भवनासाठी 15 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला आहे याला लवकरच मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करेल, असे श्री. गांधी यांनी सांगितले.