आमदार नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थिती
लाखनी,दि.३१ः स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवारी ५ एप्रिलला ‘मोती सन्मान आणि विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण’ कार्यक्रम लाखनी येथे आयोजित करण्यात आला आहे. आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पुरस्कार आणि पारितोषिक प्रदान केले जाणार आहेत. याप्रसंगी खंडविकास अधिकारी धीरज पाटील ‘२१ व्या शतकात असलेल्या संधी आणि त्यासाठी लागणारी कौशल्ये’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमाला चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त वकील दीपक चटक, जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, उद्योजक अतुल भांडारकर, किशोर वाघाये, संजय वनवे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांना मोती सन्मान देऊन गौरविण्यात येते तसेच वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा मूळचे भंडारा जिल्ह्यातील असलेले आणि सध्या स्पेन मध्ये वास्तव्यास असलेले लेखक व चित्रपट निर्माते रोशन रोशन भोंडेकर, प्रो कबड्डीसह विविध राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याचे नाव क्रीडाविश्वात नावारूपास आणणारे आकाश पिकलमुंडे आणि स्पर्धा परिक्षांच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणींसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक कार्यातही सक्रीय असलेले उमेश कोर्राम या ३ मान्यवरांना मोती सन्मान प्रदान केला जाणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण देखील याप्रसंगी पार पडणार आहे. स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा आजवरचा प्रवास विशद करणारी एक चित्रफीत आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशनसोबत काम करणाऱ्या युवकांनी सुरू केलेल्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मचा लॉन्चिंग कार्यक्रम देखील यावेळी पार पडणार आहे. सदर कार्यक्रम लाखनी येथील स्वागत सभागृहात दुपारी ४ वा होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी, पालकांनी, नागरीकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, कार्यक्रम संयोजक आशिष राऊत, विशाल हटवार, लिखीत पुडके, अनिकेत नगरकर यांनी केले आहे.