गोसीखुर्दचे पाणी सोडा, अन्यथा वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

0
68

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरीसारख्या मोठ्या नदी आहेत. त्यामुळे नदीकाठवरील शेतकरी उन्हाळी पीक घेतात. मात्र गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहात येणाऱ्या नदीपात्रातील पाणी पातळी खालावून शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे गोसीखुर्दचे पाणी तातडीने सोडा, अन्यथा येत्या 5 एप्रिल रोजी वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

यासंदर्भात काँग्रेस पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील इतरही समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी ब्राह्मणवाडे यांनी सांगितले, गोसीखुर्दचे पाणी अडविल्याने गडचिरोलीतून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पातळी खालावली. पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमधील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांना धरणातील पाणी सोडण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. मात्र त्याची अद्याप दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, तसेच पंकज गुड्डेवार, अॅड.कविता मोहरकर, नितेश राठोड, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, राजेश ठाकूर, देवाजी सोनटक्के, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, ढिवरू मेश्राम, प्रतीक बारसिंगे, निखिल खोब्रागडे, चारू पोहने, जावेद खान, रवी चापले, भाग्यवान मेश्राम, सुधीर बांबोळे, विजय लाड, उत्तम ठाकरे, कुणाल आभारे, रेशीम प्रधान, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या मागण्यांकडेही वेधले लक्ष

◆ गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळाकरीता सुपीक जमीन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करावा.

◆ भेंडाळा, ता.चामोर्शी परीसरातील एमआयडीसीसाठी प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.

◆ कोटगल बँरेजकरिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाला नाही. योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा आणि जी शेती बारमाही पाण्याखाली येते अशा शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.

◆ मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.

◆ वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वेलाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.