शेतकऱ्याची जलसंवर्धनासाठी उत्स्फूर्त देणगी – समाजासाठी प्रेरणादायी पाऊल

0
112
वाशिम,दि.१ एप्रिल- जामदरा घोटी (ता. मानोरा) येथे जमिनीतील पाणी टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या जलतारा प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मंडळ अधिकारी देविदास काटकर, तलाठी रामाघरे, कृषी सहाय्यक श्रीमती पत्रे, ग्रामसेवक श्री. चव्हाण यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामस्थांपैकी वासुदेव सुखदेव म्हस्के या संवेदनशील शेतकऱ्यांनी जलसंधारणासाठी एक अभिनव पुढाकार घेतला. जामदरा घोटी गावाच्या क्षेत्रातील भूगर्भ जलपातळी वाढावी, यासाठी मनरेगा योजनेबरोबरच शेतकऱ्यांनीदेखील जलतारा शोषखड्डे खणावेत, अशी त्यांची भूमिका होती. याच प्रक्रियेला चालना देण्यासाठी त्यांनी स्वतः ₹५० हजार देणगी म्हणून जाहीर केली. या रकमेतून त्वरित जलतारा निर्मितीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
श्री. म्हस्के यांच्या या योगदानाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांसाठीच नव्हे, तर समाजहिताच्या दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.