गोंदिया ः मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना गुरुवारी (ता. ३) सकाळपासून शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सायंकाळपर्यंत आकाशात काळेकुट्ट ढग दाटले होते. या वातावरण बदलामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाल्यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळ आणि पावसाचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणनिर्मिती झाली. बुधवारी (ता. २) मध्यरात्री शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत वादळासह तुरळक पावसाने हजेरी लावली. गुरुवारी गोंदिया शहर व तालुक्यात सकाळपासून दुपारपर्यंत तुरळक पाऊस झाला. दुपारनंतरही आकाशात मात्र ढग दाटलेले होते. सूर्यदर्शन झालेच नाही. अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी आदी तालुक्यांतही तुरळक पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणावरील उष्णतेचा दाह कमी होऊन गारवा वाढला आहे. परंतु, ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असून, कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सध्या धानाची रोवणी होऊन आठ-पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतात प्रारंभी रोवणी झालेले धानपीक लोंबी टाकत आहे.
ढगाळ हवामान किडी आणि रोगांसाठी पोषक ठरते. परिणामी, पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाती आलेले पीक निसटणार तर नाही ना, याची चिंता आता शेतकऱ्यांना आहे. हवामान खात्याने शुक्रवारीही (ता. ४) पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
मागील वर्षी अवकाळी पावसाने धान, भाजीपाला, मका, टरबूज आदी रब्बी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.