राजेंद्र जैन : रेल्वे महाव्यवस्थापकांना दिले निवेदन
गोंदिया –दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (डीआरएम) डी.बी.गुप्ता हे शनिवारी (दि.५) गोंदिया जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले होते. अमृत भारत स्टेशन योजनेत गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. यातंर्गत रेल्वे स्थानकाचे आधुनिकरण केले जात आहे. या
कामाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी माजी आ.राजेंद्र जैन यांनी त्यांची भेट घेवून शहरातील रेलटोली परिसरातील मालधक्का शहराबाहेर हटविण्याची मागणी केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देत त्यांचे समस्यांकडे लक्ष वेधले.
रेलटोली परिसरातील रेल्वे मालधक्क्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. तर याच मार्गावर शाळा महाविद्यालय असल्याने
विद्यार्थ्यांना सुध्दा याचा फटका बसतो. यामुळे अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे या मालधक्क्याचे शहराबाहेर स्थानांतरण करण्यात यावे अशी मागणी शिक्षण संस्था आणि रामनगर पोलिसांनी सुध्दा केली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराकडे जाणारा मार्ग अरुंद फारच अरुंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे गुजराती समाजवाडी, रेल्वे विश्रामगृह मार्गावरील भिंत फोडून रस्ता तयार करण्यात यावा. याचे अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. याकडे सुध्दा माजी आ.जैन यांनी डीआरम गुप्ता यांचे लक्ष वेधले. रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरण, नागपूर-बिलासपूर मार्गावरील तिरोडा रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, स्वयंचलित वाहन, फलाटावर डिस्प्ले बोर्ड, पार्किंग झोन व फलाट क्रमांक २ वर उपहारागृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली.
…………………
या रेल्वे गाड्यांना थांबे द्या
एल.टी.टी.पुरी सुपर फॉस्ट एक्सप्रेसला, हावडा-मुंबई दुरांतो एक्सप्रेस, हावडा पुणे दुरांतो एक्सप्रेसला गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. गोडवाना एक्सप्रेस, रिवा इतवारी एक्सप्रेस तिरोडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा.
………………….
रेल्वे स्थानकावरील कामे दर्जेदार करा
खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजने समावेश होवून ३६ कोटी रुपयांचा निधी
मंजूर करण्यात आला. रेल्वे स्थानकावर बरीच कामे सुरु असून ती कामे दर्जेदार व्हावी याकडे लक्ष देण्याची मागणी माजी आ. जैन यांनी
डीआरएम यांच्याकडे केली. रेल्वे स्टेशन पार्किंग परिसर, रेस्ट हाऊस व दुर्गा चौक परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात यावे. तसेच या परिसरात रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावे अशी मागणी केली.