चिचडोह प्रकल्पातील बाधित शेतजमिनीची पुनर्मोजणी होणार

0
27

चामोर्शी : तालुक्यातील चिचडोह बॅरेजच्या काही तत्कालीन अधिकाऱ्यांनी काही मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून मोजणी अहवालात गडबड केली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन या प्रकल्पात बुडत आहे, अशा अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवून काही लोकांनी आपली शेती बेकायदेशीरपणे अकृषक करून कोट्यवधीचा मोबदला शासनाकडून लाटला. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आता बाधित शेतजमिनीची पुनर्मोजणी होणार असून सर्वांना नवीन दरानुसार मोबदला दिला जाणार असल्याचे कळते.

तत्कालीन आमदार व माजी खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने चिचडोह बॅरेजला मंजुरी मिळाल्यानंतर अलिकडे तो प्रकल्प जवळपास पूर्ण झाला. या प्रकल्पात शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तत्कालीन मोजणी अधिकारी व चिचडोह बॅरेजच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमताने काही मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून बोगस मोजणी अहवाल तयार केल्याचा आरोप चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे यांनी केला आहे. यामध्ये 70 टक्केच्या वर ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात बुडत आहे, अशा शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. दुसरीकडे इतर लोकांनी आपली शेती बेकायदेशीरपणे अकृषक करून कोट्यवधीचा मोबदला शासनाकडून उचलला. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी चिचडोह बॅरेजच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागते. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून त्यांची जमीन नापीक झालेली आहे. असे असताना त्यांच्या शेतजमिनीचे लवकर अधिग्रहण होणे आवश्यक होते. परंतू या प्रकरणात शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहीले. अजुनही अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया सुरू नसताना शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पिपरे यांनी केला आहे.

आता जुना मोजणी अहवाल रद्द करून नव्याने दर ठरविले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत या प्रकल्पाचे पाणी जाते, पण तरीही त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण झाले नाही, त्या बाधित शेतकऱ्यांनी आपले अर्ज, आधारकार्ड, शेतजमिनीचा 7/12, नमुना 8, सहीत भूमि अधीक्षक कार्यालय चामोर्शी येथे आपला विनंती अर्ज दाखल करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.