वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे एसडीओ, तहसीलदार निलंबित!

0
11689
file photo

• *तुमसरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई*

• *भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा विभागीय आयुक्तांच्या चौकशीत ठपका*

• *महसूलमंत्री बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा*

भंडारा  दि. ९ एप्रिल: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजीत करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निलंबित केले. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

विशेष म्हणजे, नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत व संबंधित आरोपीवर कारवाई होण्याबाबत तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधानसभेत लक्षविधी उपस्थित करण्यात आली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात गौण खनिज प्रकरणी चौकशी केली असताना पर्यावरण विभागाची अनुमती नसताना वाळू घाटांमधून वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. हा प्रकार गंभीर असून याबद्दलची सर्वंकष चौकशी केल्यावर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.
_____

अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे.
• *चंद्रशेखर बावनकुळे* महसूलमंत्री, महाराष्ट्र