गोंदिया, दि.10 : पासपोर्ट अर्जदारांना त्यांच्या घराजवळ पासपोर्ट सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक तत्वावर विभागीय पासपोर्ट कार्यालय, नागपूर मार्फत पोस्ट मास्टर जनरल, नागपूर यांच्या नियंत्रणाखाली शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी मुख्य पोस्ट ऑफिस, गोंदिया येथे पासपोर्ट मोबाईल व्हॅन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक दिवसीय शिबिरासाठी 20 अपॉईंटमेंटसाठी ऑनलाईन बुकींग लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर यशानंतर येत्या आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस मुख्य पोस्ट ऑफिस, गोंदिया सेथे पासपोर्ट मोबाईल व्हॅन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात ताजे आणि रि-इश्यू श्रेणीचे ऑनलाईन भरलेले पासपोर्ट अर्ज स्विकारले जातील. या शिबिरात तत्काळ श्रेणी, पीसीसीचे अर्ज व इतर कोणत्याही कारणामुळे किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे आधीच होल्ड केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
ऑनलाईन नोंदणी व अधिक माहितीसाठी अर्जदारांनी केवळ अधिकृत वेबसाईट www.passportindia.gov.in च्या होम पेजला भेट द्यावी. अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल, विहित शुल्क भरावे लागेल आणि पासपोर्ट मोबाईल व्हॅनसाठी ‘‘मुख्य पोस्ट ऑफीस, गोंदिया’’ येथे अपॉईंटमेन्ट घ्यावी लागेल आणि नियुक्त केलेल्या दिवशी, वेळ आणि ठिकाणी त्यांना आवश्यक कागदपत्रांच्या मुळ आणि स्वयं-साक्षांकीत छायाप्रतीसह पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल तसेच फोटो व बोटांचे ठसे द्यावे लागतील.
आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी अर्जदारांना वर नमूद करण्यात आलेल्या वेबसाईटच्या होम पेजला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. ‘‘तुम्ही अर्ज करण्यापूर्वी’’ विभाग आणि दस्तऐवज सल्लागार व त्याखाली लिहिलेल्या इतर विविध लिंक्स पहावे. असे गोंदिया येथील मुख्य डाकघर कार्यालयाचे पोस्टमास्टर अनिल कटरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.