सालेकसा तालुक्यात “आशा दिवस ” निमित्ताने केला आशा सेविका व गट प्रवर्तकांचा सत्कार

0
50

सालेकसा,दि.१०ः- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत आशा दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे, कारण या दिनी आपण मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा) यांच्या कार्याची नोंद घेतो, ज्यांच्या मदतीने माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते, तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचते. आशा स्वयंसेविका हे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. त्या माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि माहिती लोकांना पुरवतात असल्याची माहिती प्रास्तविक प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांनी दिली.
दि. 8 एप्रिल रोजी सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांच्या कल्पक विचारातुन पंचायत समिती सभागृहात आशा दिवस समारंभ संपन्न झाला.
सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष सालेकसा पंचायत समिती सभापती वीणाताई कटरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला जि.प सदस्या छायाताई नागपुरे व जि.प सदस्या विमलताई कटरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रम सालेकसा पंचायत समिती गट विकास अधिकारी संजय पुरी तसेच सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यात डॉ.पारस गिरी, डॉ.भागवत बारई, डॉ.शितलप्रसाद महेसकर,आरोग्य विस्तार अधिकारी अरुणजी कोसमे यांचेसह कार्यक्षेत्रातील कर्मचारी वृंद,आशा सेविका व गट पर्वतक प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते.
आशा सेविका यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणुन विविध स्पर्धात्मक सांस्कृतीक कार्यक्रम यावेळी प्रस्तुत करण्यात आले.यावेळी सालेकसा तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती वीणाताई कटरे यांनी आशा कार्यकर्त्यांमुळे लोकांना आरोग्य सेवा सोप्या आणि सहज उपलब्ध होतात, ज्यामुळे गरीब आणि दूरच्या भागातील लोकांनाही आरोग्य सुविधा मिळतात असल्याची माहिती दिली तसेच जि.प सदस्या छायाताई नागपुरे यांनी आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांना आरोग्य, स्वच्छता आणि कुटुंब नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळते आणि जागरूकता वाढत असल्याची माहीती दिली तर जि.प सदस्या विमलताई कटरे यांनी आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने मातांना प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण आणि स्तनपानाचे महत्त्व यांसारख्या बाबींची माहिती मिळते, ज्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते. आशा दिनी आपण आशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असल्याची माहीती डॉ.स्वप्निल आत्राम यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी केली.