गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवी झेंडी
- केंद्राकडून 4 हजार 818 कोटी निधीला मंजूरी
- 240 कि.मी. लोहमार्गाचे होणार निर्माण
गोंदिया, दि.11 : गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे हे महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्हे असून पुर्वेकडे छत्तीसगड व उत्तरेकडे मध्यप्रदेश व दक्षिणेकडे तेलंगणा राज्याच्या सीमा या जिल्ह्यांना लागून आहेत तसेच. गोंदिया ते बल्लारशाह व चंद्रपुरकडे आंध्रप्रदेश राज्याची सीमा लागुन असल्यामुळे पुर्व विदर्भातील गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे व्यावसायिक दृष्टीकोनातून औद्योगिक वाटचालीसाठी महत्वपूर्ण जिल्हे आहेत.या जिल्ह्यांच्या सीमेतून गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्ग जात असून दुहेरीकरणाला हिरवी झेंडी मिळाली आहे.या दुहेरीकरणामुळे जिल्ह्यांच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.सोबतच लहान मोठ्या सर्व रेल्वेस्थानकाचे अमृत भारत योजनेतंर्गत सुसज्जीकरण करण्यात येत आहे.तर वडसा येथून गडचिरोलीला रेल्वेमार्ग जोडला जाईल आणि औद्योगिक विकासाची क्रांती गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेच्या माध्यमातून घडणार आहे.
आज (ता.11) दूरदृष्य आभासी परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणा संदर्भात पत्रकार परिषदेत मंजूर कामांबाबतची माहिती दिली.येत्या ५ वर्षात हे काम पुर्णत्वास येणार असून ४६९.४० हेक्टर जागेपैकी ४४४.२९२ हेक्टर जागा उपलब्ध आहे.तर वनविभागाकडून ११.२७ हेक्टर जागा या दुहेरीकरणाकरीता लागणार आहे.या मार्गावर १ मोठा पूल,३५ मध्यम पूल व ३३८ लहान पूल तयार करण्यात येणार आहेत. यावेळी दूरदृष्य आभासी प्रणालीद्वारे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार प्रफुल पटेल व जिल्ह्यातील चारही आमदार उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथून प्रभारी जिल्हाधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, रेल्वेचे उपमुख्य अभियंता इदरीस मोहम्मद,गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,चंद्रपूर येथून आमदार सुधीर मुनगंटीवार,किशोर जोरगेवार व जिल्हाधिकारी प्रत्यक्षपणे उपस्थित होते.
सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 4 हजार 818 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गोंदिया ते बल्लारशाह या दरम्यान 240 कि.मी. नविन लोहमार्गाचे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण भारताला जोडणारी ही महत्वपूर्ण परियोजना ठरणार आहे. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाला देखील मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्वपूर्ण उत्पादन तांदूळ, गडचिरोली जिल्ह्यात विविध परियोजनांतर्गत पोलाद कारखाने व चंद्रपूर जिल्ह्यातील खनिज कोळशा विदर्भाच्या विकासासाठी मैलाचा दगड (Milestone) ठरणार आहे. तसेच गोंदिया व गडचिरोली हे आदिवासी जिल्हे असून नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे येथील वनोपजाला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.