अर्जुनी मोरगाव , दि.१२ : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने ५ टक्के अपंगत्व राखीव निधीअंतर्गत आयोजित श्रवण यंत्र वितरण कार्यक्रम पंचायत समिती सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ९ कर्णबधिर लाभार्थ्यांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा उद्देश म्हणजे श्रवणास अक्षम असलेल्या व्यक्तींना संवादक्षम बनवून त्यांचे सामाजिक जीवन सुलभ करणे व सशक्त बनवणे हा होता.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “श्रवण यंत्रामुळे कर्णबधिर व्यक्तींना ऐकण्यात मोठी मदत होईल. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील.” त्यांनी सामाजिक समावेश आणि सक्षमीकरणाच्या दिशेने होणाऱ्या अशा उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते, निशाताई तोडासे, जयश्री देशमुख, माजी सभापती उमाकांत ढेंगे, खोटेले (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, समाज कल्याण), गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, तसेच पंचायत समिती सदस्य सविताताई कोडापे, डॉ. नाजुकजी कुंभरे, पुष्पलता दृगकर, कुंदाताई लोगडे, भाग्यश्री सयाम, विस्तार अधिकारी चव्हाणजी व राजुजी ब्राह्मणकर, संचालक मिलिंद कुंभरे , लैलेश्वर शिवणकर संचालक खरेदी विक्री,अनिल देशमुख यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती अर्जुनी मोरगावमधील सर्व कर्मचारी वर्ग, महिला मंडळ, तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.सदर उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. समाजातील दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणारे असे उपक्रम म्हणजे त्यांच्या सशक्तीकरणाकडे एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.