चंद्रपूर 14 एप्रिल – प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिकेने ‘ई-ऑफीस प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारींचे डिजीटल ट्रॅकिंग शक्य होणार असुन मनपाचे सर्व विभाग या प्रणालीशी जोडले जाऊन आता मनुष्यबळ, वेळ आणि कागदावरील खर्चही वाचणार आहे,
महानगरपालिकेत दररोज मोठ्या प्रमाणात टपालांची आवक जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हस्ते पारंपारीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जाते. त्यामुळे अनेकदा टपाल विभागप्रमुखांपर्यंत पोहचायला उशीर लागतो तर कधी कधी टपाल गहाळ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल हे आग्रही होते. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिंद्रावार यांनी याकामी लक्ष केंद्रीत करत ई प्रणाली सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली.
काय आहे ई ऑफीस प्रणाली –
ई – ऑफिस प्रणाली म्हणजे शासकीय कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करणे. सध्या शासनात फायलींचा प्रदीर्घ प्रवास होतो. त्याऐवजी संगणकावरून अधिकाधिक कामकाज करण्यात येणार. मनपाच्या आवक-जावक कक्षात आवक-जावकची ई ऑफीस प्रणालीवर स्कॅनिंग करून नोंद केली जाईल. पोहच देताना त्यावर ऑनलाईन नोंद झालेला डिजीटल क्रमांकही असेल, त्यामुळे या क्रमांकावरूनच आपल्या तक्रारीची, इतर अर्जाचे पुढे काय झाले, हे ट्रॅकिंग करणे सुलभ होणार आहे. संबंधित टपाल हे ज्या त्या विभागाकडे पाठविले जाईल तिथुन विभागप्रमुख आणि त्या पुढे आवश्यतेनुसार उपायुक्त,अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्याकडे संबंधित फाईल संगणकावरूनच पुढे पाठविली जाईल.
विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
महानगरपालिका क्षेत्रात ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या सूचनांनुसार, मनपा स्तरावरील कार्यालयांमध्ये तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे