कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना सर्वोच्च बुद्धिमान म्हणून गौरविले-उपायुक्त शरद चव्हाण
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात समारोप
वाशिम, दि. १४ एप्रिल-भारताच्या सामाजिक समतेच्या वाटचालीत मूलभूत दगड ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याच सप्ताहाचा समारोप आज दि. १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बाबासाहेबांचे कार्य केवळ संविधानापुरते मर्यादित नसून, ते अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी असून आजच्या काळातही दिशादर्शक असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी बाबासाहेब हे केवळ संविधान निर्माता नव्हते, तर ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते. सामाजिक न्याय, बंधुता आणि समानता या मूल्यांची पायाभरणी त्यांनी केली. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना ‘द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम’ यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान दिले हे त्यांचे जागतिक महत्व अधोरेखित करणारे आहे.
आजही आपल्या समाजात ‘इंडिया आणि भारत’ या दोन टोकांच्या संकल्पना दिसतात. ही दरी भरून काढण्यासाठी संविधानाने दिलेल्या हक्कांची जपणूक करणे, व्यक्तीस्वातंत्र्याची जाणीव ठेवणे आणि प्रत्येक घटकास समतेच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. सामाजिक समतेची ही चळवळ आपण सर्वांनी स्वतःपासून सुरू केली पाहिजे. हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.”असे प्रतिपादन उपायुक्त शरद चव्हाण यांनी केले.
अनुसूचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दि. ८ ते 14 एप्रिल २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपायुक्त शरद चव्हाण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम; प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषद, वाशिम; राज्य सहसचिव पी. एस. खंडारे, नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस; डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त गोपालराव आटोटे गुरुजी; शिवमंगल आप्पा राऊत; प्रकाश गवळीकर; वनमाला पेंढारकर; सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, समाज कल्याण आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे उपस्थित नागरिकांना वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत भारताच्या संविधानाच्या उद्देशिका/प्रास्ताविका व डॉ. साळुंखे यांचे “सर्वोत्तम भूमिपुत्र – गौतम बुद्ध” आणि डॉ. जयसिंगराव पवार यांचे “राजर्षी शाहू छत्रपती” हे पुस्तक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकातून समाज कल्याण निरीक्षक स्वरांजली पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम कार्यालयाद्वारे एकूण ४ विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समता सप्ताहांतर्गत रक्तदान केलेल्या एकूण १० रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले.
प्रमुख वक्ते गोपालराव आटोटे गुरुजी यांनी महाडच्या सत्याग्रहाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, तो केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता, तर सामाजिक समतेसाठी होता. त्यानंतर राज्य सहसचिव पी. एस. खंडारे यांनी बाबासाहेबांचा मानवमुक्तीचा लढा सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
संचालन कनिष्ठ लिपिक हरीश वानखेडे यांनी तर आभार तालुका समन्वयक स्विटी पर्वतकर यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अनिल गायकवाड, व्यवस्थापक, स्मार्ट इंडिया प्रा. लि. कंपनीचे सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.