नीट व जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे मोफत वितरण

0
52

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

 गोंदिया, दि.15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” तसेच दि.11 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” हे कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. सदर कालावधीमध्ये विविध उपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथील सांस्कृतिक सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह गोंदिया येथील गृहपाल धनंजय खराबे, प्रमुख अतिथी म्हणून सहायक पशुधन विकास अधिकारी आमगाव गुरुदास येडेवार व सावंतकुमार कटरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.

         यावेळी उपस्थित वक्त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत गोंदिया जिल्ह्यातील नीट व जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे मोफत वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, शासकीय वसतीगृहे व निवासी शाळेतील अधिकारी व कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरिक्षक राजेश मुधोळकर यांनी केले. सुत्रसंचालन आशिषकुमार जांभुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार हेमंत घाटघुमर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता मनिषा टेंभुर्णे, पुष्पलता धांडे, योगेश हजारे, मानिकराव ईरले, गिरीधर गोबाडे, पंकज काळे, लक्ष्मण खेडकर, तसेच एस-2, बीव्हीजी, क्रिस्टल लिमिटेड बाह्यस्त्रोत कंपनीचे कार्यरत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.