अकोला- जिल्ह्यातील अकोटच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एकेक “अफलातून” प्रकार समोर येत असून आत्ता तर चक्क “मेलेल्या तलाठ्या” ची मरणोत्तर विभागीय चौकशी करण्याचा देखील प्रकार समोर आला आहे.तर एसडीओ मनोज लोणारकर ह्यांच्या कामाचा आवाका “किती प्रचंड” आहे ह्याचा हा एक उत्कृष्ट “नमुना” आहे.
अकोट उपविभागातील तेल्हारा तालुक्यात एस.एम.तेलगोटे हे हिवरखेड मंडळातील तळेगाव बु.या सज्यात तलाठी म्हणून कार्यरत होते.कौटुंबिक कलहातून त्यांनी गेल्याच महीन्यात ३० मार्च रोजी शेगाव रोडवरील एमआयडीसी मागील परिसरात झाडाला फाशी घेऊन “आत्महत्या” केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
ते हयात असतानाच त्यांच्याविरुद्ध काही तक्रारींवरून तेल्हारा तहसीलदारांनी अकोटच्या या एसडीओ कार्यालयाकडे विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याच विषयाला अनुसरून उपविभागीय अधिकारी, अकोट यांनी तेल्हारा तालुक्यात कार्यरत डी.आर.झापे मंडळ अधिकारी व एस.एम.अर्थात शिलानंद माणिकराव तेलगोटे,तलाठी तहसील कार्यालय तेल्हारा यांचे विरोधात सुरु करावयाच्या विभागीय चौकशी प्रकरणाबाबत दोपारोप पत्र एक ते चार मिळण्याबाबत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. एसडीओ कार्यालयाचे हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दि. ९/४/२०२५ रोजी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
उपरोक्त विषयान्वये डी.आर.झापे, मंडळ अधिकारी तळेगाव आणि एस.एम.तेलगोटे, तळेगाव बु. तहसील कार्यालय तेल्हारा यांच्या विरूध्द मनासे (शिस्त व अपिल) नियम १९७९ चे नियम ८ व नियम १२ नूसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचे प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी म्हणून एसडीओ,अकोट यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्या अनुषंगाने प्रकरणामध्ये दोषारोप जोडपत्र एक ते चार मिळण्याबाबत त्यांनी केलेली विनंती मान्य करीत सदर चौकशी प्रकरणातील दोषारोप जोडपत्र एक ते चार यापूर्वीच विभागीय चौकशीचे आदेशा सोबत पाठविण्यात आलेले होते.
परंतु एसडीओ कार्यालयाने पुन्हा मागणी केल्यानूसार पून्हा दोषारोप जोडपत्र एक ते चारची प्रत दिनांक ११/४/२०२५ रोजी देण्यात आलेल्या पत्रासोबत सोबत बंद पाकीटामध्ये पाठविण्यात आल्याचे श्याम धामणे, अधिक्षक जिल्हाधिकारी, कार्यालय अकोला यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले.
मात्र ह्यातील वास्तविकता अशी आहे की ह्यातील एस.एम.तेलगोटे, तलाठी ह्यांच्या मृत्यूला आज तब्बल १६ ते १७ दिवस झाले आहेत. तेल्हारा तहसीलदार आणि अकोटच्या एसडीओ यांना अथवा त्यांच्या कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना ह्याची काहीच माहिती असू नये ही “अत्यंत शरमे”ची बाब आहे. ह्या प्रकारावरून एक बाब अधोरेखित होते ती अशी की ह्या दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी काही “—” करून कार्यालयीन कामकाज करतात की त्यांच्या “डोळ्यावर झापड” लावलेली आहे हे समजण्यास काहीच मार्ग नाही.
अकोटच्या एसडीओ कार्यालयातून निघालेले पत्र क्र.उविअ/आस्था/कावि-५१/२०२५ दि. २१/०२/२०२५ ला निघालेले पत्र अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दि.०९/०४/२०२५ रोजी प्राप्त झालेत.ह्या पत्राने ४५ किलोमीटरचा प्रवास करण्यास तब्बल ३९ दिवस लावले असल्याचे ह्या पत्रावरून अगदी स्पष्ट होत आहे. शासनाचे सर्व व्यवहार हे “ऑन लाइन” पद्धतीने होत असतानाही आणि ते ऑन लाइनच व्हावेत असे शासनाचे आदेश असताना आजही अकोटचे एसडीओ कार्यालय त्याचा वापर करीत नाही.ही शासनानेच आदेश डावलून “मनमानी पद्धती”ने कारभार चालविला जात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे.
आता अकोटचे उपविभागीय अधिकारी अर्थात एसडीओ कार्यालय ह्या “मेलेल्या तलाठ्या”ची विभागीय चौकशी कोणत्या पद्धतीने करेल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.ह्या विभागीय चौकशी करिता मयत असलेल्या एस.एम.तेलगोटे यांना “मृत्युलोकाच्या” कोणत्या पत्त्यावर पत्र अथवा नोटीस पाठवितात आणि हे “मयत” झालेले तलाठी कोणत्या पद्धतीने ह्या एसडीओ यांच्यासमोर हजर होतात हे पाहणे म्हणजे “अत्यंत नवलाईची” गोष्ट असणार आहे.