संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहुउद्देशीय सभागृह, आंतरगृह क्रीडा इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
17

अमरावती, दि. १७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना क्रीडा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, आमदार रवी राणा, प्रताप अडसड, प्रविण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी त्यांनी इमारत बांधकामाची माहिती घेतली. उपस्थित मान्यवरांचे डॉ. बारहाते यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

इमारतीची वैशिष्ट्ये…

विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीसाठी पीएम उषा योजनेंतर्गत 8 कोटी आणि विद्यापीठ साधारण निधीमधून 5 कोटी असा 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या इमारतीमध्ये तळमजला आणि पहिला मजला होणार असून 2401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाप्रेम आणि संघभावना जोपासण्यासाठी प्रभावी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

या संकुलात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, बुद्धीबळ, योग आणि मार्शल आर्ट या इनडोअर क्रीडा प्रकारांचा समावेश राहणार आहे. खेळाडूच्या गरजांचा विचार करून ही इमारत आधुनिक डिझाईननुसार उभारली जाणार आहे. इमारतीमध्ये दर्जेदार फ्लोअरिंग, योग्य प्रकाशयोजना, वायुविजन, बदलण्याची खोली, प्रेक्षक आसन व्यवस्था, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधा उपलब्ध राहतील. बहुउद्देशीय सभागृह खेळासह दीक्षान्त समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, विद्यापीठस्तरीय समारंभ, तसेच सामुदायिक उपक्रमासाठी उपयोगात येणार आहे.

हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जीवनकौशल्य आणि शारीरिक शिक्षणविषयक उद्दिष्टांशी सुसंगत आहे. विद्यापीठाच्या ‘आरोग्यदायी आणि सक्रिय परिसर’ निर्मितीच्या बांधिलकीचा एक भाग आहे. हे संकुल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन नवोदित क्रीडा प्रतिभा ओळखून त्या घडवण्याचे कार्य करेल. नवीन इमारत आणि सभागृह विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.