‘जलतारा’च्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे शाश्वत नियोजन करण्याची जाणीव-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

0
17
अभियानात सहभागी नागरिकांचा सन्मान उत्साहात
वाशिम,दि.17 एप्रिल –जलतारा उपक्रम हे केवळ शासकीय योजनेचे रूप न राहता जनसहभागातून साकारलेली एक जलक्रांती आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि स्वयंसेवी संस्था यांनी स्वप्रेरणेने या अभियानात सहभाग घेतला हे विशेष उल्लेखनीय आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केल्यास आपण जलसंपन्नतेकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. आजचा हा गौरव समारंभ म्हणजे या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे. या अभियानात सहभागी झालेल्यांचे कार्य प्रेरणादायी असून ते इतरांसाठी दिशादर्शक ठरेल.”असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आपल्या मनोगतातून केले.
       जिल्ह्यातील जलसंधारण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यथोचित गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम व सत्कार समारंभ बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस बोलत होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरिष बाहेती, जलताराचे जनक पुरूषोत्तम वायाळ हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय अनंत देशमुख, पतंजलीचे भागवत, श्री सारडा, नारीशक्ती फाउंडेशनच्या श्रीमती इंगोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती होती.
‘जलतारा’ उपक्रमात स्वतःहून व स्वखर्चाने जलतारे व शोषखड्डे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांचा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सन्मान करण्यात आला. विशेषतः महिलांचा जलसंधारणात असलेला सहभाग अधोरेखित करत त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
स्वयंसेवी संस्था व सामाजिक योगदानाची दखल : आर्ट ऑफ लिव्हिंग,
‘तिफन फाउंडेशन’, ‘नारीशक्ती फाउंडेशन’, ‘पतंजली’ यांसह अनेक संस्थांनी जलतारा चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सहभागी व्यक्ती आणि संस्थांची यादी ‘जलतारा डिस्ट्रिक्ट ग्रुप’वर शेअर करण्यात आली होती, ज्यामुळे कार्यक्रम अधिक सुसंगतपणे पार पडला.
      या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ केवळ सन्मानापुरती मर्यादित न राहता भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे शाश्वत नियोजन करण्याची जाणीव प्रत्येक सहभागीच्या मनात रूजवण्यात आली.यावेळी उत्साहाचे वातावरण होते.
पत्रकार परिषद तथा पत्रकारांचा सन्मान :
जिल्ह्यातील जलसंधारण क्षेत्रात प्रभावी ठसा उमटवणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद बुधवार, दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ‘जलतारा’ उपक्रमाचे वृत्तांकन केल्यामुळे उपस्थित पत्रकारांचा प्रोत्साहनपर सत्कारही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व उपस्थित मान्यवरांनी यावेळी केला.