आक्षेपार्ह पोस्ट टाळा ः पोलिस अधीक्षक भामरे

0
273
गोंदिया, ता. १७ ः धार्मिक भावना दुखावणाऱ्या बाबी किंवा पोस्ट टाळाव्यात, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिला आहे. गोंदिया शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशनगर येथील आरोपी चिराग संदीप रूंगठा याने स्वतःच्या प्रतिष्ठानामध्ये धार्मिक भावना दुखावतील, असे चित्र असलेल्या टाइल्स लावल्यावरून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी धार्मिक भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह बाबी किंवा पोस्ट टाळाव्यात, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिला आहे.
अन्यथा शिक्षण व नोकरीवर गदा येणार
कोणताही जमाव, जाळपोळ, हिंसक आंदोलन अशा घटनेत अनेक तरुण दिसून येतात. मात्र, यादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो. असे झाल्यास शिक्षण व नोकरीसाठी आवश्यक असणारे चारित्र्य प्रमाणपत्र काढताना अडचण येते. अनेकांना तर यामुळे नोकरी मिळत नाही. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही पोलिस अधीक्षक भामरे यांनी केले आहे.