बेसा परिसरात मध्यरात्री वीज खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

0
23

नागपूर (बेसा): नागपूरच्या बेसा परिसरातील अथर्व नगरी व परिसरातील रहिवासी गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार होणाऱ्या वीज खंडनामुळे संतप्त आहेत. विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.

शुक्रवारच्या मध्यरात्री पीपला रोड परिसरात विद्युत वाहक तार तुटल्यामुळे रात्री १२ ते २ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महिनाभरापासून दररोज २ ते ३ वेळा वीज खंडित होत असून, रात्रीच्या वेळेस ही समस्या अधिक गंभीर होते.

उन्हाच्या कडाक्यामुळे त्रासदायक परिस्थिती

सध्या उन्हाचा तीव्र झटका बसत असून, तापमान सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रात्री वीज गायब होण्यामुळे पंखे, कूलर, एसी बंद राहतात. परिणामी, झोपेत व्यत्यय येतो आणि नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले, वृद्ध व रुग्ण यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत क्लेशदायक ठरत आहे.

महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला दररोज त्रास सहन करावा लागतो आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तरीही रात्री लाईट गेल्यानं झोप होत नाही. लहान मुलं रडत असतात, वृद्ध लोकांना दम्याचा त्रास होतो,” असे एका स्थानिक रहिवाशाने संतापाने सांगितले.

प्रशासनाकडे तातडीची मागणी

नागरिकांनी राज्याचे ऊर्जामंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.