गडचिरोली, दि. 19 एप्रिल : जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडा येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (नागपूर मंडळ) आणि आदिवासी आश्रम शाळा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना भारतीय वारसा स्थळांचे संवर्धन, इतिहासाचे महत्त्व व पुरातत्त्व विभागाचे कार्य याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमात मार्कंडा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मंदिर परिसरात शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. सुमारे १२व्या शतकांपूर्वीच्या या प्राचीन मंदिर समूहाचे स्थापत्य वैशिष्ट्य, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक मूल्य याविषयी पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक शुभम कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जागतिक वारसा स्थळांची महत्त्व व त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर अनिष्ट घटकांचे संकलन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच वारसा स्थळांचे जतन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
या उपक्रमात शाळेचे अधीक्षक अरुण राऊत, शिक्षिका कृपांती बोरसरे, छबिलदास सुरपाम तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. इतिहासाची ओळख व वारसा संवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि संस्काराचा अनुभव ठरला.