भर उन्हात ७८८ महिलांची उपस्थिती : अदासीच्या महिला ठरले इतर गावांसाठी आदर्श
गोंदिया : दारूमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते, विकास खुंटते,तरुणाई वाममार्गाला लागते. ही स्थिती गावात राहू नये यासाठी अदासी येथील ग्राम पंचायत प्रशासन, ग्राम स्वच्छता संघ तसेच गावातील सर्व महिलांनी एकत्र येत अविनाश अशोक उजवणे यांच्या नावे असलेली ‘वाइन वर्ल्ड बियर बार’ बंद करण्यासाठी एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१९) बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत एकूण ११२० पैकी तब्बल ७८८ महिलांनी आपली उपस्थिती नोंदवून बार बंद करण्यासाठी स्वाक्षरी केली.
लगतच्या ग्राम अदासी येथे २६ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या सर्व साधारण सभेत ही बार बंद करण्यासाठी सर्वानुमते ठराव पारित केला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी व अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना कळविण्यात आले होते. त्यानंतर १० मार्च २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामपंचायतला पत्र देऊन विशेष ग्रामसभा घेण्याचे सुचविले. या बारला बंद करण्यासाठी गावातील दारूबंदी करीता महिलांची विशेष सभा, निवडणूक या पत्राचा आधार घेत शनिवारी (दि.१९ एप्रिल) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात विशेष महिला ग्रामसभेचे (निवडणूक) आयोजन करण्यात आले होते.
ही सभा शांततेत पार पाडावी तसेच गावातील सर्व महिला सभासदांना वेळेवर उपस्थित राहता यावे, म्हणून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत समितीतील सर्व सदस्य उपस्थित राहतील, असे सुचविण्यात आले होते. त्यानुसार सर्व महिला मतदार एकत्रित आले होते.
ग्रामसभेपूर्वी सादर करावे लागले ओळखपत्र
मतदारांनी त्याच गावचे रहिवासी असल्याबाबतच्या पडताळणीसाठी ग्रामसभेपूर्वी त्यांचे ओळखपत्र सादर करावे. ओळखपत्र नसल्यास ग्रामपंचायतच्या सचिवाचे त्या गावाचे मतदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. जे मतदार वरीलप्रमाणे ओळखपत्र सादर करतील, त्यांना ग्राममसभेत भाग घेता आले.
महिलांनी बार बंद करण्यासाठी हिरिरीने भाग घेतला. गावातील ११२० महिलांचे मतदान होते. त्यापैकी ७८८ महिला विशेष ग्रासभेला उपस्थित झाल्या व त्यांनी बारला विरोध दर्शविला आहे.
चित्रफीत झाली तयार
मतदारांची पडताळणी गटविकास अधिकारी व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केली. दोन्ही अधिकारी व संबंधित अनुज्ञप्तीधारकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. ग्रामसभेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीची चित्रफीत तयार करण्यात आली. ती चित्रफीत पुराया म्हणून उपयोग करण्यात येईल.
बहुमताने ठराव पारित
महाराष्ट्र शासन राजपत्र गृह विभाग मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ दिनांक २५ मार्च २००८ च्या आदेशान्वये ग्रामसभेने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यासाठी ग्रामसभेत किमान ५० टक्के एकूण मतदार किंवा एकूण महिला मतदार उपस्थित राहून साध्या बहुमताने ठराव पारित केल्यास त्या ठरावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अशी मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करावी, असा कोणताही ठराव हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ आणि त्याखालील तयार करण्यात आलेल्या नियमातील तरतुदींनुसार विधिवत झाला असला पाहिजे. तो ठराव अदासीने पारित करून दाखविला.
यांनी घेतला पुढाकार
अदासी येथील बारबंदीसाठी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत पंचायत समिती विस्तार अधिकारी तिडके, राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक काळील, माजी जि. प. सदस्य जगदीश बहेकार, सरपंच उषाताई भोंडे, उपसरपंच व सर्व सदस्यगण,पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले,ग्रामसेवक दिलीप शहारे, दारुबंदी समितीचे पुरुष अध्यक्ष सतीश भोंडे, महिला अध्यक्ष शकुंतला शिवणकर, ग्राम स्वच्छता संघ अदासी चे सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक गौतम व सर्व सदस्य,विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सदस्य, ग्राम महिला संघ, महिला बचत गट व गावातील सर्व महिलांनी पुढाकार घेतला.