चांगोटोला परिसरात बिबट जोडप्याचे बस्तान

0
242

गोरेगाव –तालुक्यातील हौसीटोला चांगोटोला शिवारात दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा एक जोडपा ठाण मांडून आहे. परिसरातील शेतकर्‍यांना या जोडप्याचे दर्शन झाले असतानाच लग्न सोहळ्यातून घरी जात असलेल्या नागरिकांनाही हे बिबट नजरेस पडले.
काहींनी मोबाईलमध्ये चित्रफीत तयार करून प्रसारीत केली. असे असले तरी वन विभागाने या घटनेला नकार देत चित्रफीत फेक असल्याचे सांगीतले. दूसरीकडे पोलिस विभागाने घटनेला दुजोरा दिला आहे. शिवारात एकासोबत नर व मादा बिबटचे दर्शन झाल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे.

गोरेगाव तालुक्याच्या अंतिम टोकावर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून चांगोटोला (हौसीटोला) गाव आहेत्र 18 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास काही शेतकर्‍यांना हौसीटोला चांगोटोला ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील शेतात नर व मादी बिबट दिसले. त्यांनी याविषयी गावकर्‍यांना माहिती दिली. यानंतर 19 एप्रिलच्या रात्री तुमसर ते चांगोटोला रस्त्यावर लग्न सोहळा आटपून येणार्‍या नागरिकांना दोन्ही बिबटांचे दर्शन झाले. घटनेची महिती गोरेगाव पोलिस व वन विभागाला देण्यात आली. गोरेगावचे पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांनी चांगोटोला गावाला भेट देत परिस्थितीचा जाणून घेतली. शेतात उन्हाळी धान व दतर पीक आहेत. महावितरणकडून सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत वीज पुरवठा केला जात आहे. शेतकरी रात्री-बेरात्री शेतात जाऊन सिंचन करीत आहेत. तेव्हा वन्य प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात गोरेगाव वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गाढवे यांच्याशी संपर्क करून प्रकाराची सत्यता जाणून घेतली असता, त्यांनी नर-मादी बिबटाचा व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले. मात्र, याप्रकाराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.