लवकरच पाणीटंचाई आढावा बैठक घेणार -खासदारांची घोषणा
गोंदिया,दि.२१ः.-गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीत फक्त १५ दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक आहे. ही परिस्थिती धोक्याची आहे आणि याबाबत प्रशासन हातावर हात धरून बसलेले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे या प्रश्नाची माहिती होताच त्यांनी यावर तात्काळ कारवाईची मागणी करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करायला लावला जाणार नाही. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा डॉ. पडोळे यांनी दिला आहे.
डॉ. पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खालील स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये गोंदिया शहरासाठी तातडीने स्वतंत्र जल नियंत्रण कक्ष सुरू करावा, पर्यायी जलस्रोत शोधून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, पाण्याच्या गरज आणि उपलब्धतेचा सविस्तर अहवाल सादर करावा तसेच काम चुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी इत्यादी सूचनांच्या समावेश आहे.
72 तासांचे अल्टिमेटम –
पाणीटंचाईच्या संबंधाने आवश्यक ते निर्णय घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल व पाणीटंचाई संबंधाने मागीतलेली माहिती 72 तासाच्या आत खासदार कार्यालयात जमा करावा, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.
खासदार डॉक्टर पडोळे यांनी माहिती दिली की संभावित पाणीटंचाई संदर्भात पाठवलेल्या सर्व पत्रांची उत्तरेही तातडीने मागवली आहेत.
जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार – खासदारांचा इशारा
जनतेच्या पाण्याच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाला झोपेतून उठवून नागरिकांसाठी काम करायला लावलं जाईल, असा खडा शब्दांत इशारा डॉ. पडोळे यांनी दिला आहे.खासदार कार्यालयाच्या सूत्रांनी माहिती दिली की डॉ. पडोळे हे लवकरच पाणीटंचाईवर सर्व अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत.