जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आणि एसपी अनुज तारे यांना ‘प्रगती अभियान’ अंतर्गत गौरव

0
26

वाशिमच्या प्रशासनाला राज्यस्तरीय सन्मान

वाशिम, दि.२२ एप्रिल-राजीव गांधी गतीमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत वाशिम जिल्ह्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची प्रशासकीय कामगिरी व योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.प्रशासकीय गतिमानता अंतर्गत सन २०२३ – २४ चे पुरस्कार सर्वोत्कृष्ट कल्पना/ उपक्रम प्रथम क्रमांक – तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वसुमना पंत यांनाही सन्मानित करण्यात आले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.२१ एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी वाशिम जिल्ह्यात ‘चिया पिक’ उत्पादनास प्रोत्साहन देत शेतीत नवोपक्रम राबवला. या आधुनिक व पोषणमूल्यांनी भरलेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, पर्यायी शेतीसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. या कृषी प्रयोगशीलतेची राज्य शासनाने दखल घेत त्यांना सन्मानित केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी रोहयो तथा कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, गटविकास अधिकारी वाशिम रविंद्र सोनोने उपस्थित होते.
या भव्य सोहळ्याला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचीही उपस्थिती लाभली होती. हा गौरव मिळवताना वाशिमने पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीच्या यादीत आपले नाव ठळकपणे नोंदवले आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जिल्ह्यातील प्रशासन कार्यात गतिमानता आणत योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. तर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कायदा-सुव्यवस्थेसह युवकांना पोलीस भरती व स्वसंरक्षणासाठी प्रेरित करणारे उपक्रम राबवले.
राजीव गांधी गतीमानता अभियान हे शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर घेतले जाणारे मूल्यमापन आहे. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जातो.
वाशिमच्या यशाने जिल्ह्याचे नाव राज्यात उजळवले असून, जिल्ह्यातील जनतेसह प्रशासनाला ही एक मोठी प्रेरणा ठरणार हे निश्चित.
प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सर्व पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन करुन नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. तर यशदाचे अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल यांनी आभार मानले.प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या अभियानातंर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.