पायाभूत सुविधांमध्ये हयगय नाही-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0
17

..बरडटोली येथील जिप प्राथमिक शाळेत वर्गखोलीचे भूमिपूजन

अर्जुनी मोरगाव,दि.२२ः-गरिबांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांची वेगळी ओळख आहे. गतकाळात जिल्हा परिषद शाळाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या अभाव निर्माण झाला होता.आता मात्र केंद्रात आणि राज्यात गरीब कल्याणकारी सरकार आहे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात याकरिता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही गोंदिया जि प चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली.ते बरडटोली येथील जिप प्राथमिक शाळेत वर्गखोलीच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसाकडे, नगरसेवक विजय कापगते,राधेश्याम भेंडारकर, पसं उपसभापती संदीप कापगते, मुख्याध्यापक पुनाराम जगजापे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेखा भोवते,सदस्य शिल्पा कोकोडे,नरेंद्र गायकवाड,प्रदीप शहारे,नागेश मस्के, उपस्थित होते.
येथील बरडटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मागील पाच वर्षापासून उन्हाळ्यात इटियाडोह कॅनलचा बॅकवॉटर तर पावसाळ्यात पावसाचे पाणी शालेय परिसरात साचत असल्याने शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. कंबरभर पाणी परिसरात साचत असल्यामुळे एक ते चार वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहांच्या वापर करता येत नव्हता, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवून वर्ग घेण्याची वेळ यायची. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.
समग्र शिक्षा अभियान जिल्हा वार्षिक योजना (2024-25) अंतर्गत 13.50 लक्ष रुपयांची वर्गखोली मंजूर करण्यात आली.या वर्गखोलीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सहाय्यक शिक्षिका शिल्पा गहाणे यांनी मानले.