नागपूर, दि. २२ एप्रिल : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपसंचालक माहिती म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज 22 एप्रिल रोजी या संदर्भातील आदेश काढले आहेत. यामध्ये वर्धेचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचाही सहभाग असून त्यांची नियुक्ती विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन नवी मुंबई येथे उपसंचालक म्हणून करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती अधिकारी या पदावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रवी गिते वर्धा येथे रुजू झाले होते. यापूर्वी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झाल्या नंतर नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक म्हणून तर बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्य केले आहे . शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी लोकपत्र, नवराष्ट्र व सामना या दैनिकांमध्ये पत्रकारिता केली आहे.
आज सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या पदोन्नतीमध्ये रवी गीते जिल्हा माहिती अधिकारी वर्धा यांना विभागीय माहिती कार्यालय कोकण येथे उपसंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील, प्रतिनियुक्ती वर असलेल्या श्रीमती मीनल शशिकांत जोगळेकर, कीर्ती मोहरील पांडे, वर्षा संतोष आंधळे व किरण जनार्दन मोघे यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.