मनरेगा आयुक्तांची मोटारसायकलने मनरेगाच्या कामावर भेट,मजुरांशी साधला सवांद

0
29
-जिल्ह्यात ४ लाख ३२ हजार मजूर अ‍ॅक्टीव्ह
-७८ लाख मनुष्यदिवस कामाचे नियोजन
-मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांची माहिती
गोंदिया,दि.२२ एप्रिल –महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजूर वर्गासाठी जीवनदायनी ठरली आहे. योजनेमुळे लोकांच्या हाताला शंभर दिवस काम मिळू लागले आसून अनेक मजुरांचे स्थलांतरण थांबले आहे.त्यातच महात्मा गांधी राष्ट्र्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त डाॅ.भरत बास्टेवाड यांनी आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर पहिलाच दौरा गोंदिया जिल्ह्याचा केला.आणि या दौर्यात मजुरांशी संवाद साधण्याकरीता चारचाकी वाहन त्या कामाच्या ठिकाणी पाेचत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोटारसायकलने प्रवास करुन अर्जुनी येथील पाझर तलावाच्या गाळ काढण्याच्या कामात व्यस्त असलेल्या मजुरांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान या आर्थीक वर्षात राज्यात १३.५० कोटी लाख मनुष्यदिवस कामाचे व  गोंदिया जिल्ह्यात सन २०२५-२६   जिल्ह्यातील मजुरांना ७८ लाख मनुष्यदिवस काम देण्याचे नियोजन असून जिल्ह्यात  ४ लाख ३२ हजार मजूर अ‍ॅक्टीव्ह असल्याची माहिती मनरेगाचे आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी आज, मंगळवार २२ एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना दिली.सध्या घडीला गोंदिया जिल्ह्यात ६९ हजार कामावर असून जिल्हा राज्यात तिसरा आहे.तर सर्वाधिक मजुर बीड जिल्ह्यात ८० व अमरावती जिल्ह्यात ७२ हजार मजुर कामावर असल्याची माहिती दिली.
मनरेगा आयुक्तांचा कारभार घेताच त्यांनी सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. याअनुषंगाने त्यांनी २१ एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मनरेगाच्या कामावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, डॉ. बास्टेवाड यांनी गोंदिया तालुक्यातील आसोली या गावाला भेट दिली असता  त्याठिकाणी सुरू असलेल्या महिला भवन, सिमेंट रस्ता व पाझर तलावाचा गाळ काढण्याचे कामावरील मजुरांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर अर्जुनी येथे मनरेगाच्या कामाची पाहणी केली. पुढे माहिती देताना डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्र मनरेगाची ११ लाख कामे अपूर्ण आहेत. त्यातील ५ ते ६ लाख कामे यंदा पूर्ण केली जाणार आहेत. ३३०० कोटी कुशल कामाचे तर १३०० कोटी अकुशल कामाचे केंद्राकडून येणे बाकी आहे. तो निधी आल्यास त्वरीत तो वितरीत करण्यात येईल. मागच्या वर्षात गोंदिया जिल्ह्याने मनरेगाचे ११६ टक्के काम केले आहे. मागेल त्या प्रत्येकाला काम देण्यास आम्ही तत्पर असल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, अप्पर उपायुक्त सुधीर मोहरीर आदी उपस्थित होते.