*बुलढाणा, दि. २3:* जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नख गळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते
या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे.
ही कारवाई आजाराच्या स्रोताचा शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.