राष्ट्रीय महामार्गांवर द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार, चालकाच्या सतर्कतेमुळे २३ प्रवासी बचावले

0
35

गोंदिया : छत्तीसगड राज्यातील रायपूर ते हैदराबादला जाणाऱ्या एका वातानुकूलित स्लीपर ट्रॅव्हल्सला रायपूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवार, २२ एप्रिलच्या रात्रीला अंदाजे ९.३० वाजताच्या सुमाराज शॉर्ट शर्किटमुळे भीषण आग लागली. वाहन चालकाला आग लागल्याची माहिती कळताच त्यांनी मोकळी जागा मिळताच ट्रॅव्हल गाडी थांबविली आणि सर्वप्रथम ट्रॅव्हल गाडीत बसलेले सर्व प्रवाशांना लागलीच खाली उतरले. दरम्यान अश्यात कुणा ही प्रवाशाला काहीही दुखापत झाली नाही. मात्र जीव मुठीत घेऊन लगबगीत ट्रॅव्हल्स खाली उतरलेल्या अनेक प्रवाश्यांचे चार्जिंगला असलेले मोबाइल आणि साहित्यासह बॅग बसमधेच राहिले. ट्रॅव्हल गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की प्रवाशांचे संपूर्ण साहित्यासह बस जळून त्याची राख रांगोळी झाली.
सदरची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ग्राम फुटाळा/ सौन्दड येथील उड्डाण पुलाच्या सर्विस रोड वर मंगळवार २२ एप्रिल च्या रात्रीला सुमारे ९:३० वाजताच्या सुमारास घडली. या ट्रॅव्हल गाडी चे चालक कुमार गिरी यांनी दिलेल्या माहिती नुसार ही छत्तीसगड राज्यातील काँकेर रोडवेज कंपनीची वातानुकूलित ट्रॅव्हल्स असून आग लागली यादरम्यान वाहनात २३ प्रवाशी बसले होते. ही ट्रॅव्हल्स रायपूर वरून हैद्राबाद ला जात होती. अश्यात त्यांच्या वाहनाला आग लागल्याचे कळताच लगेच जागा पाहून बस थांबविली आणि प्रवाश्यांना बस खाली उतरवले. या चपळतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून प्रवाशांचे संपूर्ण साहित्य मात्र जळाले. या जळालेल्या ट्रॅव्हल गाडी चे वाहन क्रमांक : सी. जी. ०४ एन.ए. ७७७६ असे असून या २३ प्रवाश्यांना या मार्गावर चालणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल गाडी मध्ये बसवून हैद्राबाद ला पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॅव्हल गाडी वाहन चालक पुढे म्हणाले की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तापमान ही खूप वाढलेला आहे. मंगळवारी गाडी दिवसभर उन्हात चालली असल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली ही आग ट्रॅव्हल गाडीच्या मागच्या बाजूला लागली होती, त्या मुळे प्रवाशांना गाडीमधून सुखरूप निघायला पुरता वेळ मिळाला. या ट्रॅव्हल गाडी मध्ये प्रवास करणाऱ्या रायपूर निवासी तामेश्वरी साहू, कुंतीबेन पटेल, अवदेश कुमार दिक्षित, अरिफ शेख या प्रवाशांनी सांगितले ट्रॅव्हल्स गाडीमध्ये आग लागल्या नंतर ट्रॅव्हल्स चे टायर फुटल्याने दोन वेळा मोठा स्फोट झाला अश्या घाबरलेल्या अवस्थेत गाडीमधून खाली उतरण्याच्या लगबगीत त्यांचे साहित्यसह बॅग आणि चार्जिंग वर लागलेले मोबाईल मोबाईल ही ट्रॅव्हल्स गाडीसोबत जळाले आहे. ही आग विजवीण्यासाठी साकोली नगर परिषद व सडक अर्जुनी नगर पंचायत येथील दोन अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले आणि पुढील दोन तासापर्यंत ही आग विझवली. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह सोबतच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन वाहनातील पथक आणि स्थानिकाच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. रात्री ११ वाजता पर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते. दरम्यानच्या काळात या घटनेमुळे नागपूर रायपूर महामार्ग संपूर्णपणे जाम झालं होतं. मुख्य मार्गावर जळालेल्या वाहनाला आग विझल्यानंतर क्रेन ने बाजूला करण्यात आले . विशेष म्हणजे सौंदड / फुटाळा येथील स्थानिक नागरिकांनी देखील आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ट्रॅव्हल्स गाडीला लागलेल्या आगीची घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. रात्री ११ वाजता नंतर महामार्ग पोलिसांनी मार्ग मोकळा केला असून वाहतुक सुरळीत केली.