1 मे पासून चंद्रपुर जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीमेची सुरुवात

0
13

मोहीम कालावधीत ओल्या कचऱ्यापासून बनविणार खत

मोहीमेत ग्रामस्थांनी सहभागी व्हावे –  पुलकित सिंग ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपुर

चंद्रपुर : 24 एप्रिल 2025- ग्रामीण जनतेमध्ये स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उदेश्याने  दि. 01 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” मोहीम चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग  यांनी केले आहे.

          स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा 2 कार्यक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिलकित सिंग  यांचे मार्गदर्शनात व  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांचे नेतृत्वात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरू आहे. गावात निर्माण करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे.  दि. ०१ मे ते दि. ३० सप्टेंबर २०२५ असे एकूण १३८ दिवस पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती व सार्वजनिकस्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे  दि. २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येईल.  दि. 29 ते 30 एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी होईल.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. ०१ मे २०२५ ला “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. दि. ०१ मे ते दि. १० मे  या  कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेप मध्ये कचरा भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची  प्रक्रिया होईल. सदर अभियाना राबविणेबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना निर्देश देण्यात आले आहे.

अभियानाची पडताळणी :

138 दिवसाच्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील.

प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान :

जास्तीत जास्त गावामंध्ये ही मोहीम राबविण्यासाठी 1 मे पासून सुरू होणाऱ्या याअभियानाची प्रचार प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व  समाज माध्यमां मध्ये करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.

अभियानाची सूचना व पुर्व तयारी :

राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पं.स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करतील. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी साज्जा कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. २५ ते 26 एप्रिल या कालावधीत अभियानाची माहिती प्रसारित करण्यात येईल.

या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर नाडेपद्वारे खत निर्मिती होईल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, ज्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येईल. ग्रामपंचायत, बचत गट आणि युवकांचा सक्रिय सह‌भाग वाढविला जाणार आहे.  त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.