- तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष कार्यशाळा
गोंदिया, दि.24 : तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात 1617 माजी मालगुजारी तलाव आहेत. या तलावातील गाळ काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात जलसमृध्दी आणणार, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील पारंपरिक जलस्त्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आमदार डॉ.परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमा ढेंगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे, माजी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी गणेश थोरात व टाटा मोटर्सचे प्रतिनिधी शैलेश माऊलीकर मंचावर उपस्थित होते.
डॉ.परिणय फुके म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री महोदयांची महत्वाकांक्षी योजना आहे. सध्या गोंड राज्यांच्या काळात बांधले गेलेले 6,700 हून अधिक माजी मालगुजारी तलाव गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे सिंचन क्षमता कमी झाली असून भूजल पातळीही घटली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेत तलाव खोलीकरणाच्या कामातून बाहेर काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. या उपक्रमाला नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले आहे. तलाव पुनरुज्जीवनामुळे पाणीसाठवण क्षमता वाढेल, भूजल स्तर सुधारेल, विहिरी व नळपाणी योजना कार्यक्षम होतील, शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल, मासेमारी व्यवसायास चालना मिळेल आणि संभाव्य पूरपरिस्थितीवरही नियंत्रण ठेवता येईल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती विशद केली. या कार्यशाळेस गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, बाघ इटियाडोह विभागाचे कार्यकारी अभियंता राज कुरेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मधुकर वासनिक यांचेसह सर्व जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.