-रेअर अर्थ असोसिएशन इंडियाच्या तिरुपती येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सत्कार
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांना ‘रिसर्च एक्सलन्स अवार्ड इन रेअर अर्थ इंडिया’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. रेअर अर्थ असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या तिरुपती येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. ढोबळे यांना पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.
‘सायन्स, टेक्नॉलॉजी अँड एप्लीकेशन ऑन रेअर अर्थ’ या विषयावर तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेअर अर्थ असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. डी. सिंग, उपाध्यक्ष डॉ. सी. के. जयशंकर, सचिव एम. एल. रेड्डी, श्री वेंकटेश्वरराव विद्यापीठ तिरुपती येथील कुलगुरू प्रो. अप्पाराव, श्री पद्मावती विद्यापीठ तिरुपतीचे कुलगुरू प्रो. उमा शर्मा, संयोजक डॉ. देवाप्रसाद राजू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रेअर अर्थ हे मेंडलिफ पिराॅओडीक टेबल मधील दुर्मिळ रासायनिक पदार्थ आहे. त्यावर संशोधन करून त्याची उपयोगिता सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात संशोधनासाठी वाढावी याकरिता ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. संस्थेने डॉ. ढोबळे यांना या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिरुपती येथे बीजभाषण (Palanery Talk) करण्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी डॉ. ढोबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात तयार रेअर अर्थची उपयोगिता यावर भाषण दिले आणि रेअर अर्थचे महत्व पटवून दिले. डॉ. ढोबळे हे रेअर अर्थवर कार्य करून याद्वारे निर्मित होणारे वेगवेगळे मटेरियल याला फॉस्फर म्हणतात त्यावर कार्य करतात. यामध्ये प्रामुख्याने एलईडी, रेडिएशन डॉसिमेट्री, वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः कॅन्सरवर कार्य करतात. रेअर अर्थवर संशोधन करीत असताना डॉ. ढोबळे यांनी १००० च्यावर शोधनिबंध स्कोपसमध्ये, १०५ च्यावर पेटंट व ३१ आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तके प्रकाशित करून एकूण ८० विद्यार्थ्यांना पीएचडी बहाल केली आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी केल्या जात आहे. त्यातून त्यांचे गुगलवर १८,००० च्यावर व एकूण १५,००० स्कोपसवर सायटेशन प्राप्त झालेले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत रेअर अर्थ इंडियाने डॉ. संजय ढोबळे यांना रिसर्च एक्सलन्स रेअर अर्थ इंडिया द्वारा सन्मानित केले आहे.
डॉ. संजय ढोबळे यांनी पुरस्कार मिळाल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, या पुरस्कारानंतर माझी संशोधनातील जबाबदारी आणखी वाढली आहे. या संशोधनामध्ये सोबत कार्य करणारे संशोधक विद्यार्थी, सहयोगी संशोधक यांचे देखील त्यांनी आभार मानले. हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांना समर्पित केला. या पुरस्कारामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त झाला आहे, असे ढोबळे यांनी सांगितले. अत्यंत प्रतिष्ठित असा ‘रिसर्च एक्सलन्स अवार्ड इन रेअर अर्थ इंडिया’ पुरस्कार प्राप्त झाल्याने डॉ. संजय ढोबळे यांचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर व सर्व संशोधक मित्रांनी अभिनंदन केले आहे.