जागतिक हिवताप दिनानिमित्त प्रभातफेरीतुन जनजागृती

0
27

गोंदिया,दि.२६ः- हिवतापाला संपवू या, पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली शुक्रवारी दि. 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गोंदियात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभाग जिल्हा परिषद,जिल्हा हिवताप विभाग,राष्ट्रिय आरोग्य अभियान व शासकीय नर्सिंग महाविद्यालय गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हास्तरीय हिवताप प्रतिबंधात्मक जनजागृती प्रभातफेरी च्या माध्यमातून करण्यात आली.
हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,प्राचार्य जिजी येलाम यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी संपन्न झाली.प्रभातफेरीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी हिवतापावरील घोषवाक्याच्या निनादात सहभाग घेतला.
कार्यक्रम प्रसंगी डॉ.नितीन वानखेडे यांनी गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित असुन जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असल्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.लोकसहभाग व ईतर विभाग, एनजीओ यांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देवुन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणुक बदलण्यावर विशेष लक्ष केंदीत करण्याच्या सुचना केल्यात.
कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात,संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.
प्रभात फेरीदरम्यान जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील नेहा चिचमलकर, विशाखा रामटेके, दिपीका गजभिये, विश्वघोष रंगारी, दुर्गा बिरहा तसेच हिवताप विभागाचे किशोर भालेराव,अनिल चोरवाडे,वर्षा भावे,आशिश बले,आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे,डोंगरे,पंकज गजभिये प्रामुख्याने उपस्थितीत होते प्रभात फेरीदरम्यान उपस्थितांच्या हस्ते हिवताप आजाराबाबत विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.