गोंदिया-हिरापूर येथून गणखैरा येथील भात गिरणीत भरडाईसाठी धान घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. घटनेत ट्रकची कॅबिन पुर्णतः खाक झाली. ही घटना शनिवार 26 एप्रिल रोजी गोरेगाव-गोंदिया राष्ट्रीय राज्य महामार्गावर गोरेगाव येथील पवन तलाव परिसरात घडली.
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, घटनेत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. काही धान पोतींचेही नुकसान झाले. घोटी येथील प्रगती सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे हिरापूर येथील गोदामात ठेवलेले धान शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भरडाईसाठी ट्रक क्रमांक एमएच 04 जीसी 3877 ने हिरापूर येथून गोरेगाव मार्गे गणखैरा येथील राजफुड मिल येथे जात असताना गोरेगाव-गोंदिया राष्ट्रीय राज्य महामार्गावरील शहरातील पवन तलाव परिसरातील साई बार पुढे ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला. ही बाब ट्रकचालक समीर शेखच्या लक्ष्यात येताच तो ट्रक थांबवून बाहेर आला. घटनेचे गांभीर्य पाहता परिसरातील कैलास खरवडे यांच्या दुचाकी दुरुस्तीच्या दुकानातून पाईपद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. काहींनी आपापल्या घरून पाणी पुरवठा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हाणी झाली नाही. यावेळी कैलास खरवडे, गुड्डू कटरे, राम अगडे यांच्या प्रसंगावधाने ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविता आले. त्यातच माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना घटनेची माहिती होताच त्यांनी नगरपंचायतच्या एका कर्मचार्यासह स्वतः घटनास्थळावर अग्निशमन वाहन घेऊन आले.
ट्रकला आग लागल्याची माहिती गोरेगाव नगरपंचायतला देण्यात आली. मात्र नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे नगरपंचायत गोरेगावची फायर ब्रिगेडचे वाहन वेळेवर येऊ शकले नाही. ही शोकांतिकाच आहे. आशिष बारेवार माजी नगराध्यक्ष, गोरेगाव