पुढील ५०० दिवसांसाठी पाणी राखीव
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात पाण्याचे स्रोत कमी झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने एक दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परंतु, ही समस्या काही दिवसांकरीताच असून पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांनी चिंता करून नये, आगामी ५०० दिवसांसाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे, असे आश्वासन आ. विनोद अग्रवाल यांनी दिले. पाणीटंचाईच्या समस्येला घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी पाणी नियोजनात्मक विशेष बैठक बोलाविली होती. आणि प्रकल्प क्षेत्राची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी नगर परिषद, तहसीलदार, मजिप्राचे कार्यकारी अभियंता, बाग इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता आदिंशी चर्चा करून विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भविष्यात तीव्र उन्हाळा आणि संभाव्य पाणीटंचाई आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गोंदियातील रहिवाशांना पुढील ५०० दिवसांसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एक हजार कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये पाणी नियोजनाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला. बैठकीनंतर आमदारांनी स्वताः सर्व अधिकाऱ्यांसह पंप हाऊस आणि नदीच्या जागेला भेट दिली. तातडीच्या परिस्थितीत, आमदारांनी आज बाग इटियाडोह प्रकल्पाला पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. हे पाणी पुढील ७ दिवसांत गोंदियात पोहोचेलआणि नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, दरम्यान, शहरवासीयांनी संयम बाळगावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी आ. विनोद अग्रवाल यांच्यासोबत न.प.चे प्रभारी मुख्य अधिकारी व प्रशासक आणि अतिरिक्त तहसीलदार श्रीकांत कांबळे, मजिप्राचे कार्यकारी अभियंता गणवीर, बाग इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुरेकर, उप अभियंता डोंगरे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पाटील, उप अभियंता मडकाम, अभियंता मजीप्रा पालथे उपस्थित होते.