लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
40
  • सेवा हक्क दिन साजरा

        गोंदिया, दि.28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत नागरिकांना विहित मुदतीत व कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांनी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

        श्री. नायर म्हणाले, शासनाच्या विविध विभाग तसेच प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा काहीवेळा सामान्य माणसापर्यंत पोहचत नाही किंवा त्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांना अनेकवेळा प्रयत्न करावे लागतात. या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी राज्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 हा कायदा केला आहे. नागरिकांच्या शासनाच्या अधिसूचित सेवा प्राप्त करुन घेण्याचा अधिकार देणारा तसेच प्रशासनाला जबाबदार व उत्तरदायी बनविणारा हा कायदा आहे. या कायद्यामुळे नागरिकांना तत्परतेने, विहित कालावधीत सहज व सुलभपणे सेवा मिळणे शक्य होणार आहे असे त्यांनी सांगितले.

       आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांच्या एक हजारहून अधिक सेवा या कायद्यांतर्गत अधिसूचित करण्यात आल्या असून यापैकी 527 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत आणि आपले सरकार पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’ तसेच ‘आर.टी.एस. महाराष्ट्र’ या मोबाईल ॲपवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. लोकसेवा हक्क कायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत सन 2024-25 या कालावधीमध्ये लोकांना तत्परतेने सेवा दिल्याबद्दल सहायक अधीक्षक संजय धार्मिक, जिल्हा प्रकल्प प्रमुख राकेश हिवरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिश्चंद्र पौनिकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 बाबत सविस्तर माहिती विशद केली.

        कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक संतोष महाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक अधीक्षक संजय धार्मिक व देवेंद्र पोरचेट्टीवार, जिल्हा प्रकल्प प्रमुख राकेश हिवरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिश्चंद्र पोनिकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.