गोंदिया,दि.२८ : मागील दोन वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही प्रकरणे तातडीने निकाली काढा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
२७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनहक्क पट्टे प्रकरणांचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे. अनेक वर्षापासून लाभार्थी वनहक्क पट्टयांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी सुरु असलेल्या संथ कार्यवाहीमुळे त्यांच्यामध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे. ही प्रकरणे तातडीने निकाली काढले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातच शिबीर आयोजित करण्यात येईल.
आठ दिवसाच्या आत गाव समिती, तालुका समिती, उपविभागीय स्तरावरील समिती व जिल्हास्तरीय समितीकडे किती प्रकरणे प्रलंबीत आहेत हे संबंधित अधिकाऱ्यांनी बघावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, अर्जुनी/मोर व सडक/अर्जुनी तालुक्यासाठी १५ दिवसाच्या आत शिबीर आयोजित करावे. त्यामुळे वैयक्तीक वनहक्क पट्टयांचे प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रलंबीत असलेल्या वनहक्क पट्टयांबाबत सातत्याने संबंधित स्तरावरुन आढावा घेण्यात येत असून ही प्रकरणे तातडीने निकाली निघावेत यासाठी प्रशासन गांभीर्याने काम करीत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्री.मोहिते यांनी यावेळी सांगितले.