नागपूर-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटना अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभारी व संपर्क नेत्यांची नियुक्ती केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर नागपूर व वर्धा, अनिल देशमुख यांच्याकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आघाडीच्या काळात काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते संपर्कमंत्री होते. सत्तेत असतानाही राष्ट्रवादीला पाहिजे तसा जनाधार मिळवता आला नाही. पक्षाच्या स्थापनेपासून दीड दशकानंतर विरोधी बाकावर बसण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या सुमारे दोन वर्षांनी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याने राष्ट्रवादीही तयारीला लागली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गटबाजी असून शहकाटशहचे राजकारण सुरू आहे. मुंडे यांना संघटन बळकट करताना गटबाजी थोपवावी लागणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अमरावती आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे बुलडाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सत्तेत असताना या नेत्यांनी विदर्भाला खूपच कमी वेळ दिल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे. अनिल देशमुख यांच्याकडे भंडारा व गोंदिया, मनोहर नाईक यांच्याकडे यवतमाळ-वाशीम, रमेश बंग चंद्रपूर-गडचिरोली, तर राजेंद्र शिंगणे यांच्यावर अकोल्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे