चंद्रपूर,दि.31ः- अंबुजा सिमेंटमध्ये जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून संघर्ष सुरू आहे. मात्र या संघर्षाची दखल अंबुजा सिमेंटचे व्यवस्थापक घेत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच ते प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अंबुजा सिमेंटच्या या आडमुठय़ा धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच प्रशासनाला याबाबत तातडीने पावले उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेवक पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात ६ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे.
अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही मध्ये जमीन गेलेल्या आदिवासी व इतर प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचा मागील अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. बारा गावातील प्रकल्पग्रस्त आदिवासींना हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवले ,आदिवासींची फसवणूक केली असा या सर्व प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध प्रकारचे आंदोलन केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चार महिन्यापुर्वी एक सदस्य चौकशी समिती गठित केली होती. कल्पना निळ-ठुबे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या एक सदस्यीय समितीने या प्रकरणात नुकतीच चौकशी पूर्ण करून जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर केला. एकीकडे सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरीकरिता संधी दिल्याचे अंबुजा व्यवस्थापन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सांगत असले तरी चौकशी समितीसमोर लेखी पुरावे अंबुजा व्यवस्थापन देऊ शकले नाही. तसेच अंबुजाने जिल्हा प्रशासनाला पुरविलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे सुद्धा अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.अंबूजा व्यवस्थापनाविरोधात अँक्ट्रासिटी तर अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व अहवालाच्या अनुसरून अंबुजा विरोधात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांकरिता सर्व प्रकल्पग्रस्त आदिवासी-शेतकरी मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास शेत जमिनीवर ताबा घेण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त आदिवासींनी दिलेला आहे.