गडचिरोली, दि..७:अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणखी भयावह होत असून, गोसेखुर्द व चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.त्यातच जिल्ह्यातील पुरपरिस्थीतीचा आढावा घेण्याकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंग व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हेलीकाॅप्टरच्या माध्यमातून भामरागड तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.पामुलगौतम व पर्लकोट नदीला पूर आल्यामुळे ५०० ते ६०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.भामरागड येथील परिस्थिती अद्यापही पुरबाधित असून तहसीलदार अंडील व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे तेथील परस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.आजही पुरपरिस्थीतीमुळे जिल्ह्यातील तब्बल १९ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.
गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे दीडमीटरने, तर ८ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९८१६ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडण्यात आले असून,त्यातून १८२०४ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना बाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. काल रात्री १० वाजतापासून आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे. दिना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने आष्टी-मुलचेरा हा मार्गही दोन दिवसांत दुसऱ्यांदा बंद झाला आहे. गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी व् आलापल्ली-भामरागड हे प्रमुख मार्ग आधीच बंद झाले आहेत.