*सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची सूचना आज होणार प्रसिध्द
वाशिम, दि. १७ : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार आज, १८ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. या सुचनेमध्ये निवडणुकीच्या संदर्भातील तारखा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची, त्याची छाननी करण्याचे ठिकाण, मतमोजणीसाठी तारीख व वेळ नमूद आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०१९ ते २३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. रविवार, २२ डिसेंबर २०१९ रोजी सार्वजनिक सुट्टी दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. २४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. आवश्यक असल्यास ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी बुधवार, ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.
निवडणुकीच्या तारखांची सूचना वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम जिल्हा परिषद कार्यालय, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व त्यामध्ये असलेल्या गावांत त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.