जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा
वाशिम दि. २८ : येत्या ७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.आज २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा घेताना श्री. मोडक बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवडणूक निरीक्षक नरेंद्र लोणकर, अप्पर जिल्हाधिकारी दिनेशचन्द्र वानखेडे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, संदीप महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोडक पुढे म्हणाले, निवडणुकीच्या कामासाठी पुरेशी वाहन व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी. आवश्यकतेनुसार खाजगी वाहन भाडेतत्त्वावर घ्यावीत, तसेच शासकीय वाहने अधिग्रहित करावीत. निवडणूक विषयक साहित्य पुरेशा प्रमाणात मतदान पथकाला उपलब्ध करून द्यावे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत राजकीय पक्ष व उमेदवारांना अवगत करावे.मतदान ते मतमोजणी प्रक्रिया ही सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावे.
निवडणूकविषयक कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी योग्य नियोजन व समन्वयातून काम करावे. निवडणुकीच्या काळात एकही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर संबंधित मतदारांच्या याद्या मतदान केंद्रावर उपलब्ध कराव्यात असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, निवडणुकीच्या काळात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील आवश्यक त्या गुन्हेगारांचे निवडणुकीच्या काळात तडीपारीचे आदेश काढण्यात येतील. संवेदनशील असलेल्या मतदान केंद्राला उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट द्यावी, असे त्यांनी सांगितले.श्री. काळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८५२ मतदान केंद्रावर ७ लाख ४५ हजार ७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ३ लाख ५४ हजार ४८० स्त्री मतदार, ३ लाख ९० हजार ५८७ पुरुष मतदार आणि ९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या कामासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे.
आढावा सभेला निवडणूक निर्णय अधिकारी अनपु खांडे (कारंजा), व्यंकट राठोड (मानोरा), सुहासिनी गोणेवार (मंगरुळपीर), राजेंद्र जाधव (मालेगाव), गणेश राठोड (रिसोड), प्रकाश राऊत (वाशिम), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डी. बी. मांजरे (कारंजा), सुनील चव्हाण (मानोरा), किशोर बागडे (मंगरुळपीर), रवी काळे (मालेगाव), ए. एन. शेलार (रिसोड), विजय सावळे (वाशिम), उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड, यशवंत केडगे, एस. डी. पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.